
पुणे येथील ‘एज्युकेशनल हेल्प फाउंडेशन – हातभार शिक्षणासाठी’ या संस्थेच्या निःस्वार्थ आणि राजकारणविरहित सामाजिक कार्याने प्रेरित होऊन एका अज्ञात दानशूर व्यक्तीने ₹40 हजारांची आर्थिक मदत केली. विशेष म्हणजे, संबंधित दात्याने आपल्या नावाची कुठेही प्रसिद्धी न करण्याची विनंती करत प्रसिद्धीपेक्षा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत महत्त्वाची असल्याचा आदर्श घालून दिला. फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ, गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली जाते. नागरिक दरमहा ₹100 किंवा त्यापेक्षा अधिक स्वेच्छा निधी तसेच वाढदिवस व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देणगी देऊन या उपक्रमात सहभागी होतात. पारदर्शक आणि निःस्वार्थ कार्यामुळे संस्थेवरील समाजाचा विश्वास वाढत असून, “हातभार शिक्षणासाठी...” या उपक्रमाला नागरिकांनी आपल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन फाउंडेशनच्या संचालक मंडळाने केले आहे.
