पुणे/मंचर, गावडेवाडी : समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून राजकारणविरहित आणि निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘एज्युकेशनल हेल्प फाउंडेशन – हातभार शिक्षणासाठी’ या संस्थेच्या कार्याची दखल घेत एका अज्ञात दानशूर व्यक्तीने संस्थेला रु. 40 हजारांची आर्थिक मदत केली आहे. फाउंडेशनचे सामाजिक कार्य तसेच व्हॉट्सॲपवरील स्टेटस पाहून परिचयातील एका व्यक्तीने संस्थेच्या कार्याला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, मदत देताना या दानशूर व्यक्तीने संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे “माझ्या नावाची कुठेही प्रसिद्धी करू नये,” अशी विनंती केली. प्रसिद्धीपासून दूर राहून समाजोपयोगी कार्याला मदत करण्याची त्यांची ही भूमिका कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरली आहे. या आर्थिक मदतीबद्दल फाउंडेशनच्या वतीने अज्ञात दात्याचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद लाभावा, अशी सदिच्छा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हातभार एज्युकेशनल हेल्प फाउंडेशन ही संस्था अनाथ, गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून दरमहा रु. 100 किंवा त्यापेक्षा अधिक स्वेच्छा निधी जमा केला जातो. तसेच वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यांसारख्या कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगीही नागरिक स्वेच्छेने देणगी देऊन या उपक्रमात सहभागी होतात. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे राजकारणविरहित पद्धतीने कार्य करणे आणि कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी अथवा मान-सन्मानाची अपेक्षा न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणे. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्याच्या या कार्याला समाजातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रामाणिक, पारदर्शक आणि निःस्वार्थ भावनेने सुरू असलेल्या या कार्यामुळे नागरिकांचा संस्थेवरील विश्वास वाढत असून, त्यातूनच अशा प्रकारची मदत स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे या घटनेतून दिसून येते. “शिक्षणासाठी हातभार लावण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने आपल्या परीने या उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहन फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. टीम – एज्युकेशनल हेल्प फाउंडेशन, पुणे ‘हातभार शिक्षणासाठी...’