कला • संस्कृती • सन्मान

पद्मश्री अशोक सराफ यांचा कलासारथी कला मंचतर्फे तैलचित्र व मानपत्र देऊन गौरव

संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक; पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

वडगाव कांदळी | प्रतिनिधी : पोपट बढे

महाराष्ट्राचे लाडके व ख्यातनाम अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘कलासारथी कला मंच रजिस्टर, पुणे’ या संस्थेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी उत्साहात सत्कार करण्यात आला. घोडेगाव येथील चित्रकार हेमंत काळे यांनी स्वतः साकारलेले आकर्षक तैलचित्र आणि संस्थेचे सचिव बाबासाहेब जाधव सर यांनी समर्पक शब्दांत तयार केलेले मानपत्र देऊन अशोक मामांचा गौरव करण्यात आला.

या विशेष सत्कारप्रसंगी कलासारथी संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक जयेश शिंदे, अखिल मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य तथा संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रकाशशेठ नेहरकर, संस्थेचे कोषाध्यक्ष तथा चित्रकार हेमंत काळे आणि संस्थेचे संस्थापक तथा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक रामदास काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

भेटीदरम्यान संस्थेच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती अशोक सराफ यांना सविस्तर देण्यात आली. संस्थेचे कार्य ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला. संस्थेच्या कार्याचा गोषवारा जाणून घेत पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कलासारथी कला मंचच्या या उपक्रमाचे आणि संस्थेच्या कार्याचे सांस्कृतिक वर्तुळातून कौतुक होत आहे.