व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ग्रँडपेरेंट्स डे’ उत्साहात संपन्न
चिमुकल्यांचे नृत्याविष्कार, आजी-आजोबांची मनोगते आणि मनोरंजक खेळांनी कार्यक्रमाला रंगत
विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी-कांदळी येथे विद्यार्थ्यांच्या लाडक्या आजी-आजोबांसाठी ‘ग्रँडपेरेंट्स डे’ अर्थात ‘आजी-आजोबा दिवस’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नातवंडांवरील प्रेमापोटी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आजी-आजोबांमुळे शाळेचा परिसर आनंदाने आणि आपुलकीने भारून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करण्यात आले. त्यानंतर श्री. भास्कर चव्हाण व सौ. यमुना भास्कर चव्हाण या आजी-आजोबांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री तांगतोडे, समन्वयिका सौ. जयश्री कुंजीर व सौ. श्वेता कोकणे, तसेच बालचमूंचे आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीनियर केजी व नर्सरीच्या चिमुकल्यांनीही मनमोहक नृत्याविष्कारातून आजी-आजोबांची मने जिंकली. आजी-आजोबांची मनोगते आणि त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विशेष नृत्यामुळे कार्यक्रमाला भावनिक व आनंददायी रंगत आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्सरीच्या वर्गशिक्षिका सौ. तृप्ती डुंबरे यांनी केले. त्यांना शिक्षिका सौ. मानसी पाचपुते यांची साथ लाभली. प्री-प्रायमरी विभागातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाची संपूर्ण तयारी नियोजनबद्ध पद्धतीने केली. यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. अंकुशशेठ सोनवणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) श्री. दुष्यंत गायकवाड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आजी-आजोबा आणि नातवंडांच्या स्नेहपूर्ण सहभागामुळे हा सोहळा आनंददायी ठरला.





