न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावला राज्यस्तरीय ‘आदर्श शाळा’ पुरस्कार जाहीर
४ ऑक्टोबर रोजी कुंजरवाडी येथे पुरस्कार वितरण; मुख्याध्यापक अनिल देसले व शिक्षकवृंदाचे अभिनंदन
पुणे : आंबेगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव या माध्यमिक विद्यालयाला एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श शाळा’ पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्याध्यापक श्री. अनिल देसले यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला भरत गोगावले, शरद सोनवणे, माऊली कटके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ यांनी पत्राद्वारे पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक श्री. अनिल देसले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंबेगाव तालुक्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
यापूर्वीही विद्यालयाला आणि मुख्याध्यापक श्री. देसले यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राज्यस्तरीय ‘आदर्श शाळा’ पुरस्कारामुळे विद्यालयाच्या सन्मानात आणखी भर पडली आहे.





