१३९वी कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अवसरी खुर्द येथील विद्यालयात विविध उपक्रम; शिक्षण, समता आणि चारित्र्याचा मान्यवरांकडून संदेश
अवसरी खुर्द : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त श्री भैरवनाथ विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पराग नागरिक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सचिन शहा होते. प्रशासक प्रसाद कराळे, पोलीस पाटील संतोष शिंदे आणि रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी डॉ. डी. आर. गायकवाड उपस्थित होते. डॉ. पांडुरंग गायकवाड प्रमुख वक्ते होते.
शैक्षणिक प्रगतीसोबत क्रीडा क्षेत्रातही यश
जयराम मटाले यांनी विद्यालयाचा इतिहास सांगितला. विद्यालयाच्या पहिल्या वर्षी ३७ विद्यार्थी होते, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. खेळासाठी अतिरिक्त तास दिला जातो. क्रिकेटमध्ये विद्यालयाने तालुक्यात प्रथम क्रमांक, तर कुस्तीमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. विद्यालयात तांत्रिक शिक्षणाची सुविधा असून फाउंडेशन बॅचची सुरुवातही करण्यात आली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा चषक देऊन सन्मान
एनएनएमएस परीक्षेत कार्तिकी शिंदे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. अन्विता आगळे हिची एनएनएमएससाठी निवड झाली, तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत साहिल शिंदे आणि मुंजाजी डोंगरे यांनी यश मिळवले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा चषक देऊन गौरव करण्यात आला.
विद्यालयाच्या विकासासाठी देणगीदारांचे सहकार्य
विद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचे आभार मानण्यात आले. पराग मिल्कच्या सहकार्याने विद्यालयात वॉटर प्लांट उभारण्यात आला. नांदी फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी निधी दिला जातो, तर गुणी विठ्ठल फाउंडेशनने ट्रॉफीसाठी मदत केली. गणपत टेमकर यांनी बेंचसाठी, तर सचिन लोंढे यांनी क्रिकेट किटसाठी सहकार्य केले. दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची सुविधाही उपलब्ध आहे. अनिल शिंदे, भास्कर आणि ताटे यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही आभार व्यक्त करण्यात आले.
येत्या दिवाळीपासून देवीआई निवासी व अनिवासी शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यालयाची भिंत पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल प्रशासकांचे आभार मानण्यात आले. विशाल टेमकर यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या भाषणांतून कर्मवीरांच्या विचारांना उजाळा
विद्यार्थी वक्ते पृथ्वीराज केशव टेमकर, ईश्वरी उमेश शिंदे आणि सार्थक नीलेश टेमकर यांनी भाषणे केली. पृथ्वीराजने “कर्मवीर भाऊराव महान का वाटतात?” या विषयावर बोलताना सर्व जाती-धर्मांच्या जयंती साजऱ्या करण्यामागील समतेचा विचार मांडला.
ईश्वरीने “रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील” या विषयावर भाषण केले. “माणसातच परमेश्वर शोधावा. रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी असल्याचा मला अभिमान आहे,” असे ती म्हणाली. सार्थकने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जीवनकथा सांगितली. नवनाथ शिंदे यांनी विद्यालयाची यशोगाथा मांडली.
गरिबी शिक्षणाच्या आड येता कामा नये
प्रमुख वक्ते डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना, “गरिबी शिक्षणाच्या आड येता कामा नये,” हा त्यांचा विचार अधोरेखित केला. विद्यार्थ्यांची जडणघडण आणि त्यांच्या प्लेसमेंटकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
“ज्याने वेळ पाळली, तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात वेळ सांभाळा.”
— डॉ. पांडुरंग गायकवाड
डॉ. डी. आर. गायकवाड यांनी शिक्षण, शहाणपण आणि चारित्र्य यांचे महत्त्व सांगितले. “शिक्षणाला शहाणपणाची जोड मिळते तेव्हाच माणूस यशस्वी होतो,” असे ते म्हणाले. चरित्रवाचनामुळे चारित्र्य सुधारते, असे सांगून त्यांनी धर्माचा अर्थ नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करणे, असा स्पष्ट केला.
मान्यवरांचा सत्कार; विचारप्रवर्तक पुस्तक भेट
कार्यक्रमात मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना ‘शरद पवार यांचे विचारविश्व – खंड १ : नेमकं बोलणं’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
यावेळी देविदास शिंदे, रवींद्र वाळके, अजय घुले, विनोद बोंबले, विवेक टेमकर, विशाल शिंदे, संदीप भोर, प्रशांत अभंग, कल्याण शिंदे (माजी सरपंच), राजाराम बाणखेले (जनरल बॉडी सदस्य), उर्मिला तांबे, सुरेश भोर, गणपत टेमकर, केशव टेमकर, दीपक शर्मा (एचआर हेड, पराग मिल्क), संजय नाकरा (प्लांट हेड, पराग मिल्क), रामवत सर, दैनिक मीडिया मंत्रचे संपादक किसन टाव्हरे, पत्रकार रवींद्र वाळके, सचिन ढोणे (ग्रामपंचायत सदस्य, अवसरी खुर्द),विकास भोर , विजय घिसे, गायकवाड मॅडम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.





