लाखणगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वन्यजीव सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती
लाखणगाव : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वने विभागाच्या धामणी परिक्षेत्र व मंचर परिमंडळांतर्गत वन्यजीव सुरक्षा सप्ताहानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला धामणी परिक्षेत्राच्या वनपाल सौ. नीलम चव्हाण, वनरक्षक सौ. पूजा कांबळे, वनरक्षक सौ. अस्मिता शिंदे, लोणी येथील वनरक्षक श्री. योगेश निघोट तसेच पुणे रेस्क्यू टीमचे आदेश देसाई आणि रोहिदास म्हसणे उपस्थित होते. शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांमधील वन्यजीवांविषयीची अनावश्यक भीती दूर करून जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध पीपीटी सादरीकरणे आणि व्हिडिओ दाखवण्यात आले. वन्यजीवांशी संबंधित प्रसंगांत घ्यायची काळजी आणि त्यांच्या संरक्षणाविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशनकडून मिळालेल्या ई-लर्निंग स्मार्ट प्रोजेक्टर संचाचा कार्यक्रमासाठी उपयोग झाला. व्हिडिओ, ऑडिओ आणि पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या विषयाची माहिती आकर्षक व परिणामकारक पद्धतीने समजली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. अनिल देसले यांनी केले. सूत्रसंचालन सौ. रसिका शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. छाया वाघुंडे यांनी केले.




