हिरकणी विद्यालयात नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात

गावडेवाडी, दि. ३ (वार्ताहर:-नितिन भालेराव) : तंबाखू, गुटखा, दारू, ड्रग्ज यांसारख्या व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःला दूर ठेवून निरोगी व आनंदी जीवन जगावे. व्यसनाची सुरुवात अगदी छोट्या सवयींपासून होऊ शकते. त्यामुळे चुकीची संगत, कुतूहल आणि मित्रांच्या दबावापासून सावध राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन P.A.C.E. Group, Pune यांच्या समन्वयिका अश्विनी तांबे यांनी केले.
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत हिरकणी विद्यालय, गावडेवाडी येथे गुरुवारी (दि. ३) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास इयत्ता आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तांबे यांनी व्यसनांचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. व्यसनामुळे आरोग्याची हानी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, व्यक्तिमत्त्व विकासावर आणि भविष्यातील ध्येयांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘नकार देण्याचे धैर्य ठेवा आणि व्यसनाला आयुष्यात प्रवेश करू देऊ नका,’ असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून थेट संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनांशी संबंधित विविध प्रश्न विचारले. तांबे यांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत शंकांचे निरसन केले. PPT व लघुपटाच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय जनार्दन मेंगडे सर यांनी करून दिला. मुख्याध्यापक निवृत्ती हुले सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मार्गदर्शक समन्वयिका अश्विनी तांबे यांचा दहीतुले मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष औदुंबर कोकणे तसेच मल्टी स्किल निदेशक नितीन भालेराव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदेश गावडे, संतोष टेमकर व शरद गावडे यांनी आवश्यक व्यवस्था पाहिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल रासकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करून व्यसनमुक्त, निरोगी आणि जबाबदार समाजनिर्मितीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश देण्यात आला.




