आयसीएमआर महाविद्यालयाची एनआयएसएम येथे औद्योगिक भेट
विद्यार्थ्यांना सिक्युरिटीज मार्केट, आर्थिक साक्षरता आणि वित्तीय क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट रिसर्च (आयसीएमआर) महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (एनआयएसएम) येथे एकदिवसीय औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संचालक डॉ. महावीर शेटिया, एमबीए विभागप्रमुख डॉ. आकाश गावडे आणि एमसीए विभागप्रमुख प्रा. शाहुराज येवते यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या भेटीदरम्यान एनआयएसएमच्या पार्टनरशिप अँड मार्केटिंग विभागातील (नॉन-इन्स्टिट्यूशनल) असिस्टंट मॅनेजर श्री. दीपक शर्मा यांनी विद्यार्थ्यांना सिक्युरिटीज मार्केट, भांडवली बाजाराची कार्यपद्धती, आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वित्तीय क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची माहितीही त्यांनी दिली.
भेटीचा मुख्य उद्देश
उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांचे व्यावसायिक ज्ञान वाढविणे आणि भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे.
या औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत झाली. वित्तीय बाजारपेठेतील आधुनिक कार्यपद्धती, गुंतवणुकीचे व्यवहार आणि व्यावसायिक कौशल्यांची ओळख विद्यार्थ्यांना झाली.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार श्री. विलास लांडे, संस्थेचे सचिव श्री. सुधीर मुंगसे, खजिनदार श्री. अजित गव्हाणे, विश्वस्त श्री. विक्रांत लांडे आणि विश्वस्त श्री. सुमित मुंगसे यांनी आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा औद्योगिक भेटी महत्त्वपूर्ण ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक ज्ञानात भर पडली असून, त्यांच्या भावी करिअरच्या दृष्टीने ही भेट उपयुक्त ठरल्याचा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला.





