कौशल्य शिक्षणातून उमेद, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी पहाट
कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य, मनात उमेद आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचा अनुभव.
शिकण्याची कृतीयुक्त पद्धत
“हाताने काम करत करत शिकणे” ही संकल्पना माझ्यासाठी केवळ शिक्षणातील एक प्रयोग नाही; ती माझ्या शैक्षणिक प्रवासाचा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात घडताना पाहिलेल्या परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, पुस्तकी शिक्षणाबरोबर त्यांच्या हाताला कौशल्य मिळावे, त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, या दूरदृष्टीतून डॉ. कल्याण यांनी कौशल्य शिक्षणाची संकल्पना ग्रामीण भागात रुजविण्यासाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.
या विचाराशी माझे नाते शिक्षक होण्यापूर्वीच जोडले गेले होते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मला स्वतःला कौशल्याधारित शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष कामातून शिकण्याचे महत्त्व मला अनुभवातून समजले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शिक्षणाची गरज आहे, याची खात्री तेव्हाच मनात निर्माण झाली. याच अनुभवातून प्रेरणा घेऊन संस्थेशी चर्चा केली आणि सुमारे १८ वर्षांपूर्वी हिरकणी विद्यालय, गावडेवाडी येथे “मूलभूत तंत्रज्ञान” हा अभ्यासक्रम सुरू केला.
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मला स्वतःला कौशल्याधारित शिक्षण घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष कामातून शिकण्याचे महत्त्व मला अनुभवातून समजले.
प्रयोगातून आत्मविश्वासाकडे
अवघड वाटणाऱ्या संकल्पना सोप्या कृतीतून समजावून सांगण्यावर भर दिला. अवघड यंत्रांपेक्षा सुरक्षित व साध्या साधनांचा वापर केला. एखादी कृती का आणि कशी घडते, तिच्यामागील कार्यकारणभाव काय आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. यातून एक वेगळाच प्रवास सुरू झाला—प्रश्न विचारण्यापासून प्रयोग करण्यापर्यंत आणि प्रयोगापासून नव्या निर्मितीपर्यंत.
विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद उमलू लागली. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून काही निर्माण करावे, यासाठी विविध उपक्रम राबविले. विविध स्पर्धा, प्रदर्शन, कार्यशाळा आणि क्षेत्रभेटींमधील सहभागामुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य इतरांसमोर मांडण्याची संधी मिळाली. स्वतः तयार केलेली वस्तू किंवा मॉडेल समजावून सांगताना त्यांच्या आत्मविश्वासात झालेली वाढ स्पष्टपणे जाणवत होती.
विशेष म्हणजे, पारंपरिक अभ्यासात फारसा रस नसलेले काही विद्यार्थी कौशल्याधारित उपक्रमांमध्ये मनापासून रमले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, काम करण्याची उत्सुकता आणि “मीही काही करू शकतो” हा निर्माण झालेला विश्वास हे या उपक्रमाचे सर्वात मोठे फलित होते.
अडचणींवर मात करून पुढे
सुरुवातीचा काळ सोपा नव्हता. नवीन अभ्यासक्रम, साधनांची उपलब्धता, वेळेचे नियोजन, प्रात्यक्षिकांची आखणी, विभागांची मांडणी आणि विद्यार्थ्यांना या नव्या शिक्षणपद्धतीशी जोडणे अशा अनेक अडचणी होत्या. मात्र संस्थेचा पाठिंबा, निदेशकांची साथ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे प्रत्येक अडचणीवर मार्ग शोधता आला.
जीवनाशी जोडलेले कौशल्य शिक्षण
हळूहळू कृतीयुक्त शिक्षणाची संस्कृती शाळेत रुजत गेली. चार विभागांतून जीवनाशी जोडलेले शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मूलभूत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांची ओळख करून देण्यासाठी चार प्रमुख क्षेत्रांवर काम करण्यात आले—अभियांत्रिकी; ऊर्जा व पर्यावरण; शेती, पशुपालन व बागकाम तंत्रज्ञान; आणि गृह व आरोग्य.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधने व तंत्रज्ञानाची ओळख, ऊर्जा वापर व पर्यावरण संवर्धन, शेतीशी निगडित कौशल्ये, पशुपालन व बागकाम तसेच घरगुती व्यवस्थापन, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या जीवनोपयोगी बाबी प्रत्यक्ष कृतीतून समजत गेल्या.
काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण कदाचित अपेक्षित नसतील; परंतु त्यांच्यात सर्जनशीलता, आत्मविश्वास, काम करण्याची तयारी आणि समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण होताना दिसली. भविष्यातील व्यवसायाची दिशाही त्यांना मिळाली.





