आंबेगाव | प्रतिनिधी – विनोद बोंबले : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कारासाठी आंबेगाव तालुक्यातून एक मुख्याध्यापक, दोन शिक्षक व एका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अशा चार गुणवंतांची निवड झाली आहे.
यामध्ये वनेश्वर माध्यमिक विद्यालय, तिरपाड येथील मुख्याध्यापक श्री. प्रकाश सखाराम इंदोरे यांची गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच श्री नवखंड माध्यमिक विद्यालय, पारगाव तर्फे खेड येथील उपशिक्षक श्री. ज्ञानदेव शिवाजी गाडगे आणि महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मंचर येथील उपशिक्षिका सौ. स्मिता भागचंद बांगर यांची गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यापैकी एक पुरस्कार महिलेसाठी राखीव आहे. जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, घोडेगाव येथील वरिष्ठ लिपिक श्री. श्याम बापू वाघमारे यांची गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती, पुणे येथे होणार आहे. यावेळी आंबेगाव तालुक्यातील पुरस्कारप्राप्त गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील चार गुणवंतांची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची आणि योगदानाची जिल्हास्तरावर दखल घेतली गेल्याने ही बाब संपूर्ण आंबेगाव तालुक्यासाठी अभिमानाची असल्याची भावना व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. सुनील वळसे पाटील आणि सचिव श्री. अनिल देसले यांनी दिली.