राजपूर (ता. आंबेगाव) : राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत राजपूर (ता. आंबेगाव) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. भूमिका अभिनय स्पर्धेत शाळेने प्रथम, तर लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. भूमिका अभिनय प्रकारात प्रथम क्रमांक मिळाल्याने शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण देवकर यांनी दिली.
NPEP व NCERT, नवी दिल्ली यांच्या कृती आराखडा २०२६-२७ नुसार लोकसंख्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आंबेगाव तालुकास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
भूमिका अभिनय स्पर्धेत राजपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘भावनिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या आशयपूर्ण अभिनयाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत प्रथम क्रमांक पटकावला. या संघात प्रणाली गेंगजे, प्राची शिंगाडे, श्रावणी कारोटे आणि संचित दाते यांनी सहभाग घेतला. या यशामुळे राजपूर आश्रमशाळेच्या संघाची जिल्हास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लोकनृत्य स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली. ‘इंटरनेट व सामाजिक माध्यमांचा सुरक्षित वापर’ या समकालीन विषयावर लोकनृत्याच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देत विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला. या लोकनृत्यात चांदणी मुकणे, सुजाता बाणेरे, साक्षी कारोटे, सृष्टी केंगले, वैभवी असवले आणि दिक्षा मेचकर यांनी सहभाग घेतला.
यशस्वी विद्यार्थ्यांना साधना राक्षे-भेके यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण रेखा थोरात व शिल्पा कदम यांनी केले, तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राजेश मंदावर, ज्योत्स्ना माशेरे, स्वाती पडवळ आणि छाया केदारी यांनी नियोजन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल घोडेगावचे प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते, गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका, मुख्याध्यापक लक्ष्मण देवकर, राजपूरचे सरपंच चंद्रकांत लोहकरे, उपसरपंच गोरक्षनाथ वायळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुंदा जढर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे व आंबेगाव तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
राजपूर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत यश





