भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा देशभरात डंका!
‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार जाहीर
दिलीप वळसे पाटील यांच्याकडून कारखान्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक
मीडिया मंत्र न्यूज नेटवर्क | दि. १२ सप्टेंबर २०२६
पारगाव प्रतीनिधी (अमोल ढोबळे ) : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड, नवी दिल्ली यांच्यातर्फे गाळप हंगाम २०२४-२५ साठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार भीमाशंकर कारखान्याला जाहीर झाला आहे.
देशपातळीवरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी सहकारमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड कामगार आणि वाहतूकदारांचे विशेष अभिनंदन केले.
वळसे पाटील यांच्याकडून कौतुक
भीमाशंकर कारखान्याला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे कारखान्याच्या शिस्तबद्ध कारभाराची, उत्कृष्ट व्यवस्थापनाची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती आहे. संचालक मंडळापासून ते कामगारांपर्यंत प्रत्येक घटकाने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे, अशा शब्दांत दिलीप वळसे पाटील यांनी कारखान्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
कारखान्याच्या यशामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वळसे पाटील यांनी अधोरेखित केले. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कारखान्यावर विश्वास कायम ठेवला. त्या विश्वासाला आधुनिक तंत्रज्ञान, काटेकोर आर्थिक नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि कार्यक्षम गाळप व्यवस्थापनाची जोड मिळाल्यामुळे भीमाशंकरने देशपातळीवर नावलौकिक मिळविला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हा पुरस्कार केवळ कारखान्याचा किंवा संचालक मंडळाचा नसून आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मचारी आणि कामगाराचा सन्मान आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडविता येतो, हे भीमाशंकर कारखान्याने आपल्या कार्यातून सिद्ध केले असल्याचेही वळसे पाटील यांनी नमूद केले.
‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार आठ वेळा मिळविणारा भीमाशंकर हा देशातील एकमेव सहकारी साखर कारखाना ठरला आहे. त्यामुळे या पुरस्काराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कारखान्याने ऊस उत्पादनवाढ, दर्जेदार ऊस पुरवठा, वेळेवर गाळप, आर्थिक शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर सातत्याने भर दिला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक ऊस लागवड पद्धतींचे मार्गदर्शन करण्यासोबतच ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल आणि रोजगारनिर्मितीमध्येही कारखान्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
या यशानंतरही कारखान्याने समाधानी न राहता भविष्यात अधिक आधुनिक, सक्षम आणि शेतकरीकेंद्रित वाटचाल करावी, अशी अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली. कारखान्याची प्रगती म्हणजे आंबेगाव तालुक्याची प्रगती असून, राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा बहुमान आगामी काळातील विकासासाठी नवी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तूरा
भीमाशंकर कारखान्याच्या राष्ट्रीय यशामुळे आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, सभासद आणि शेतकऱ्यांकडून कारखान्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार आंबेगावच्या सहकार चळवळीची ताकद आणि भीमाशंकर कारखान्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेणारा ठरला आहे.

