संत निरंकारी मिशन

७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ

‘जागृती’ संकल्पनेवर आधारित समागमातून प्रेम, सेवा, करुणा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश

समालखा, २० सप्टेंबर २०२६ वार्ताहर : विनोद बोंबले

विविधतेने नटलेल्या या जगात आपली रूपे, भाषा आणि जीवनशैली वेगवेगळी असली, तरी या बाह्य भिन्नतेच्या पलीकडे असलेली चेतना एकच आहे. आपण सर्वजण परमात्म्याचीच लेकरे आहोत. सत्गुरूंनी आपणा सर्वांना प्रेमाच्या अदृश्य धाग्याने जोडून मानवतेच्या एकतेचा संदेश दिला आहे. संत निरंकारी मिशन हीच भावना ‘वसुधैव कुटुंबकम्—संपूर्ण विश्व एक परिवार’ या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात साकारत आहे. येथे प्रेम हा केवळ विचार नसून, तो जीवन जगण्याची कला म्हणून प्रत्ययास येत आहे.

२३ ते २६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान समालखा येथे ७९वा वार्षिक निरंकारी संत समागम

सत्गुरूंच्या पावन सान्निध्यात समागम

७९वा वार्षिक निरंकारी संत समागम परम आदरणीय सत्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हरियाणातील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात येणार आहे.

आत्मिक जागृती आणि मानवतेच्या एकतेचा संदेश हृदयात घेऊन देश-विदेशातून लाखो श्रद्धाळू भक्त या समागमात सहभागी होणार आहेत. सत्गुरूंचे दिव्य दर्शन आणि पावन प्रवचन यांच्या माध्यमातून श्रद्धाळूंना आत्मिक शांतीचा अनुभव घेता येणार असून, जीवनात प्रेम, सेवा, करुणा आणि मानवतेची भावना अंगीकारण्याची प्रेरणा मिळणार आहे.

सेवास्थळाचे निरंकारी राजपिताजींच्या हस्ते उद्घाटन

समागमाच्या सेवांचा शुभारंभ श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावाने भारलेल्या वातावरणात करण्यात आला. निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन हस्ते सेवास्थळाचे उद्घाटन झाले. या वेळी मिशनच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य, केंद्रीय सेवादलाचे अधिकारी तसेच हजारो श्रद्धाळू भक्तांनी प्रेम आणि निष्ठेने सेवेत सहभाग घेतला.

संत निरंकारी मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय राजकुमारी ‘मामीजी’ आणि संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून निरंकारी राजपिताजींचे हार्दिक स्वागत केले. हा पावन प्रसंग सेवा ही साधना मानून, समर्पणाला जीवनाचा आधार बनविण्याची प्रेरणा देणारा ठरला.

सेवेतून ‘मी’ची भावना संपून ‘आपण’ची भावना निर्माण होते

७९व्या संत समागमाच्या सेवांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित श्रद्धाळूंना संबोधित करताना निरंकारी राजपिताजींनी सत्गुरू माताजींचे प्रेम आणि आशीर्वाद संतांपर्यंत पोहोचविले. संत समागमाच्या सेवांचे हे विशाल स्वरूप असंख्य संतांच्या निःस्वार्थ सेवा, त्याग आणि समर्पणाचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले.

मानवजन्म केवळ स्वतःसाठी नव्हे, तर इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी मिळाला आहे. सेवेतून ‘मी’ची भावना संपून ‘आपण’ची भावना निर्माण होते, तेव्हाच सेवेचा खरा अर्थ प्रकट होतो. सत्गुरूंचे ज्ञान हीच ती जागृती आहे, जी आपली दृष्टी बदलून प्रत्येक मानवामध्ये निरंकाराचे स्वरूप पाहण्याची प्रेरणा देते.

“जेव्हा मानव मानवावर प्रेम करेल आणि त्याचा सन्मान करेल, तेव्हा ही धरती अधिक सुंदर बनेल.”

सत्गुरूंच्या चरणी हीच प्रार्थना आहे की, आपण केवळ मानव म्हणून नव्हे, तर आपल्या कर्मातून आणि वर्तनातूनही खऱ्या अर्थाने मानव बनू शकू, असे निरंकारी राजपिताजींनी सांगितले.

यंदाच्या संत समागमाची संकल्पना — ‘जागृती’

यंदाच्या संत समागमाची ‘जागृती’ ही संकल्पना आहे. ही संकल्पना मनुष्याला बाह्य जगापासून अंतर्मुख होऊन स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची आणि आपल्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून घेण्याची प्रेरणा देते.

सत्गुरू माताजींनी सांगितले आहे की, जागरूकता आणि सजगतेने भक्त प्रत्येक क्षणी भक्तीमध्ये तल्लीन राहतात. ‘जागृती’ म्हणजे एखाद्या नव्या गोष्टीची अचानक जाणीव होणे नव्हे, तर प्रत्येक क्षणी स्वतःच्या अंतरंगात सजग आणि सचेत राहणे होय. संसारात राहूनही त्याच्या प्रभावापासून स्वतःला अलिप्त ठेवणे आणि प्रत्येक परिस्थितीत प्रभुस्मरणाशी जोडलेले राहणे, हीच खरी ‘जागृती’ आहे.

विविधतेतून एकत्वाचा संदेश

निरंकारी संत समागम कोणत्याही धर्म, जात, भाषा किंवा प्रदेशापुरता मर्यादित नसून, मानवता आणि सत्याचा प्रकाश पुढे नेणाऱ्या प्रत्येक हृदयाचा संगम आहे. येथे सेवेद्वारे मानवता आणि अध्यात्म यांचा दिव्य मिलाप घडतो. हजारो हात सेवेसाठी एकत्र येतात, तर लाखो हृदये प्रेमाच्या बंधनात जोडली जातात. विविधतेतही एकत्वाचा संदेश या समागमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार झालेला अनुभवास येतो.

© २०२६ मीडिया मंत्र न्यूज | तरुणांचा बुलंद आवाज