कुरवंडी येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी
ढोल-लेझीम, टाळ-मृदंगाच्या गजरात प्रतिमेची भव्य मिरवणूक; वारकरी आणि लेझीम पथकाच्या सादरीकरणाने ग्रामस्थ भारावले
मीडिया मंत्र न्यूज | कुरवंडी प्रतींनिधी (जगदीश गुरव)
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक आणि शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती कुरवंडी येथील श्री. हरिश्चंद्र सिताराम तोत्रे विद्यालयात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची माहिती विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जगदीश गुरव यांनी दिली.
जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कर्मवीरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टरमधून कर्मवीरांच्या प्रतिमेची कुरवंडी गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.
ढोल-लेझीमच्या तालावर गाव दुमदुमले
विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचे वारकरी पथक आणि विद्यार्थिनींचे लेझीम पथक हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. ग्रामपंचायत चौकात दोन्ही पथकांनी केलेल्या सुंदर आणि शिस्तबद्ध सादरीकरणाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मिरवणुकीचे गावातील विविध ठिकाणी ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. ग्रामस्थांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. या मिरवणुकीमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे सदस्य जयराम मार्तंड तोत्रे, सुनिल गंगाराम तोत्रे, बबन मारुती तोत्रे आणि संदीप दत्तात्रय तोत्रे, माजी उपसरपंच जितेंद्र जयसिंग तोत्रे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विकासशेठ देवराम बारवे, उपाध्यक्षा अर्चना सहाणे, चेअरमन बन्शीलाल शंकर गटे, माजी चेअरमन दत्तात्रय कोंडाजी तोत्रे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कैलासशेठ तोत्रे, युवा कार्यकर्ते नितीनशेठ तुकाराम तोत्रे, रविंद्र तोत्रे आणि देवेंद्र तोत्रे उपस्थित होते.
विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जगदीश गुरव यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. कर्मवीरांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या शिक्षण चळवळीचे स्मरण करून त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कर्मवीरांच्या शिक्षणविषयक विचारांचा जागर करत विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक समतेचा संदेश

