परंपरा, भक्ती अन् शिस्तीचा संगम; श्री दत्त गणेश सेवा मंडळाची विसर्जन मिरवणूक दिमाखात
डीजेविना ढोल-ताशांचा निनाद; महिला व बाल गणेशभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
अवसरी खुर्द येथील सर्वात जुने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या श्री दत्त गणेश सेवा मंडळाची विसर्जन मिरवणूक भक्ती, उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवत पार पडली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत महिला, तरुण कार्यकर्ते आणि बाल गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मंडळाने अनेक वर्षांपासून डीजेविरहित विसर्जन मिरवणुकीची परंपरा जपली आहे. यंदाही ढोल-ताशांच्या निनादाने परिसर भक्तिमय झाला. ढोल-ताशा पथकात तरुणांसोबत महिला कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिस्तबद्ध आणि तालबद्ध मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी श्री भैरवनाथ मंदिर चौकात गर्दी केली होती. नागरिकांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले. मंदिर चौकात मंडळाचे दिवंगत कार्यकर्ते जालिंदर भालेराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रसाद कराळे आणि माजी सरपंच सुनिता कराळे उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात मंडळाने लहान मुले आणि महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अलंकार बाणखेले प्रस्तुत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात मयूरी रुपेश ढुमणे यांनी सलग दुसऱ्या वर्षी मानाची पैठणी पटकावली. मंडळातील महिला कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मासवडीच्या जेवणाचाही परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब टेंबेकर, बाळासाहेब वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते धनंजय ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव उत्साहात, शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला, अशी माहिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. संतोष ढुमणे यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश भालेराव, दीपक वाघमारे, नरेश भालेराव, हेमंत कुलकर्णी, रमेश भोर, देविदास भालेराव, ओजस ढुमणे, सत्यवान भालेराव, बापू मुळे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





