डॉ. सत्यवान थोरात यांची कृषी अभ्यासक्रमांच्या नवीन मान्यतेसाठी विषयतज्ज्ञ म्हणून निवड
‘सर्टिफिकेट कोर्स इन पोल्ट्री फार्मिंग’च्या निरीक्षणात सहभाग; शैक्षणिक व व्यवस्थापन क्षेत्रातील ३२ वर्षांचा अनुभव
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान विभागामार्फत कृषीविषयक नवीन अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी निरीक्षणाचे काम सुरू झाले आहे. या अंतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन पोल्ट्री फार्मिंग’ या नवीन अभ्यासक्रमाचे नुकतेच निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणासाठी ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील व्यावसायिक विभागाचे प्रमुख डॉ. सत्यवान थोरात यांची विषयतज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली.
निरीक्षणावेळी डॉ. थोरात यांच्यासमवेत पिंपरी चिंचवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अमर जाधव आणि गटनिदेशक विठ्ठल भुमकर उपस्थित होते. जय हिंद इन्स्टिट्यूट, चाकणच्या संस्थाचालक डॉ. जयश्री भूमकर यांनी संस्थेत सुरू असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली.
डॉ. थोरात हे गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी समर्थ इन्स्टिट्यूट, चाकण येथील दोन संस्थांचे निरीक्षण केले आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘उद्यानविद्येची मूलतत्त्वे’ या विषयाच्या अभ्यासक्रम समितीतही त्यांनी काम केले आहे.
सहकारी संस्थांमध्ये तज्ज्ञ सल्लागार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागांमध्ये ते कृषीविषयक अभ्यासक्रमांचे अध्यापन करीत आहेत.
विषयतज्ज्ञ म्हणून झालेल्या या निवडीबद्दल डॉ. सत्यवान थोरात यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.





