पुणे जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्रां’साठी अर्ज प्रक्रिया सुरू

पुणे ग्रामीण प्रतिनिधी – विनोद बोंबले
पुणे, दि. ८ : पुणे जिल्ह्यात नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील निश्चित करण्यात आलेल्या रिक्त ठिकाणी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील सूचना, रिक्त केंद्रांची यादी, अर्जाचा नमुना तसेच आवश्यक अटी व शर्ती पुणे जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात व अटी-शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, शहरी भागासाठी अर्ज प्रक्रिया ७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. तर ग्रामीण भागासाठी मुदतवाढ देऊन ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. आपण सदर अर्ज www.pune.gov.in वरुण डाऊनलोड करू शकता.
‘आपले सरकार सेवा केंद्रां’च्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्रे तसेच ऑनलाइन शासकीय सेवांचा लाभ स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे नवीन केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना जवळच्या परिसरात शासकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
इच्छुक अर्जदारांनी पुणे जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘आपले सरकार’ विभागाला भेट देऊन संबंधित जाहिरात, रिक्त जागांची यादी आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती तपासावी. अर्ज करण्यापूर्वी आपल्या गावात अथवा परिसरात केंद्राची जागा रिक्त आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.
इच्छुकांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पात्र अर्जदारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे अधिकृत सूचनांनुसारच अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


