संदिप भोर
श्री गणेशा नागरी पतसंस्थेची तिसरी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त; २ कोटी ४२ लाखांच्या ठेवी आणि ५ लाख ८५ हजारांचा निव्वळ नफा
वडगाव कांदळी : श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सुनील देवराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. अल्पावधीत संस्थेने केलेली आर्थिक प्रगती आणि संस्थेला प्राप्त झालेला ऑडिट वर्ग ‘अ’ याबद्दल उपस्थित मान्यवरांनी संचालक मंडळाचे कौतुक केले.
आर्थिक प्रगतीचा आढावा
सभेत सादर करण्यात आलेली संस्थेची आर्थिक आकडेवारी
अल्पावधीत संस्थेची आर्थिक भरारी
तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्थेचे २ हजार ४०० सभासद आहेत. संस्थेकडे २ कोटी ४२ लाख रुपयांच्या ठेवी असून, ६२ लाख ९१ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. संस्थेने १ कोटी ८० लाख ८१ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. खेळते भांडवल २ कोटी ६९ लाख १२ हजार रुपये असून, संस्थेची आर्थिक स्थिती स्थिर असल्याची माहिती चेअरमन सुनील पवार यांनी दिली.
संस्थेचा चालू आर्थिक वर्षातील निव्वळ नफा ५ लाख ८५ हजार रुपये आहे. कोणत्याही बँकेकडून कर्ज न घेता संस्थेने आपला कारभार चालविला असून, या आर्थिक वर्षात संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. या कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त करून संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
काटकसरीचा कारभार; सभासदांच्या मदतीला प्राधान्य
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय खेडकर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्थेने दूरदृष्टीने विचार करून जुन्नर तालुक्याचे कार्यक्षेत्र स्वीकारले असून, परिसरात तालुका कार्यक्षेत्र असलेली ही पहिली व एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व संचालक काटकसरीने कारभार करीत असून, आर्थिक अडचणीत आलेल्या सभासदाला मदत करण्याची संस्थेची भूमिका उल्लेखनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विविध कर्जसुविधा आणि ऑनलाइन बँकिंगचे नियोजन
संस्थेचे कार्यक्षेत्र जुन्नर तालुका असून, सभासदांना आरटीजीएस, एनईएफटी, तारण कर्ज, गृहतारण कर्ज, वाहनतारण कर्ज, जामीनकी कर्ज आणि सोनेतारण कर्जाच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. सर्व सभासदांना ऑनलाइन बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे चेअरमन सुनील पवार यांनी स्पष्ट केले.
पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
सभेला व्हाईस चेअरमन रवींद्र वामन, सचिव वर्षा पिंगळे, खजिनदार सोमनाथ रेपाळे, संचालक अविनाश पवार, इंद्रभान गायकवाड, विनोद निलख, महेंद्र सोनवणे, उत्तम पवार, रमेश खुडे, गणेश खेडकर, संचालिका शोभा पाचपुते, वैशाली शिंदे, व्यवस्थापक शशिकांत पवार, दैनंदिन ठेव प्रतिनिधी शुभम पाचपुते तसेच योगिता गुंजाळ उपस्थित होते.
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय खेडकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नितीन पवार, डिजिटल ग्रामपंचायत कांदळीचे सदस्य विनायक गुंजाळ, तसेच रेश्मा फुलवडे, संजय जगदाळे, भागुजी भोर, दत्तात्रय महाले, सुभाष लांडगे, सुनील पटाडे, सुरेश निलख, दत्तात्रय पवार, बबन पवार, चंद्रकांत पवार आणि रंगनाथ पाचपुते यांची उपस्थिती होती.
याशिवाय शंकर घाडगे, केरभाऊ थोरात, गोरक्ष मुटके, ज्ञानेश्वर मोढवे, सुधाकर पाचपुते, नामदेव पिंगळे, दिगंबर शिंदे, दिनकर बढे, मारुती लांडगे, बाळासाहेब पाचपुते, नितीन पिंगळे, पोपट थोरात, सुजीत पवार आणि मंदा मोढवे यांच्यासह ग्रामस्थ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन व संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा
यावेळी संजय खेडकर, नितीन पवार, रंगनाथ पाचपुते, विनायक गुंजाळ आणि रेश्मा फुलवडे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सभेचे प्रास्ताविक संचालिका शोभाताई पाचपुते यांनी केले. वार्षिक अहवालाचे वाचन व्यवस्थापक शशिकांत पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन रवींद्र वामन यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार संचालक महेंद्र सोनवणे यांनी मानले.





